भाषेचे अलंकार व प्रकार | मराठी व्याकरण | sankshipt

alankar

भाषेचे अलंकार व प्रकार

स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण घटकामध्ये भाषेचे अलंकार व प्रकार या घटकावर दोन ते तीन प्रश हमखास असतात. भाषेचे अलंकार व प्रकार यांचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. कोणतेहि गद्य वा पद्य (काव्य) श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे भाषेचे अलंकार होय. मराठीत आलेले बहुतेक भाषेचे अलंकार व प्रकार हे संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.

भाषेच्या अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत :

  • अ) शब्दालंकार ब) अर्थालंकार
अ) शब्दालंकार
  • 1. अनुप्रास 2. यमक 3. श्लेष
ब) अर्थालंकार
  • 1. उपमा 2. व्यतिरेक 3. दृष्टान्त 4. विरोधाभास 5. उत्प्रेक्षा 5. अतिशयोक्ती 6. स्वभावोक्ती

भाषेचे अलंकार व प्रकार :

अ) शब्दालंकार

1) यमक अलंकार :

  • कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंलंकार होतो.
उदा :
  • जाणावा तो ज्ञानी |
    पूर्ण समाधानी |
    निःसंदेह मनी |
    सर्वकाळ ||
  • या वैभवाला तुझ्या पाहुनिया,
    मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी
    सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी,
    तसे पाहिले मी न कोठे तरी ।।
  • पहिला पाऊस पडला
    सुगंध सर्वत्र दरवळला

2) अनुप्रास अलंकार :

  • मराठी व्याकरणामध्ये जर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चारनांमध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती ( वारंवार ) होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार निर्माण होतो.
उदा :
  • गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
    शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
    ( गडद गडद जलदची पुनरावृत्ती)

3) श्लेष अलंकार :

  • जेंव्हा एखाद्या वाक्यामध्ये एकच शब्द दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा निर्माण होणार्या अलंकाराराला ‘श्लेष असे म्हणतात. 
उदा :
1. मित्राच्या उद्याने कोणास आनंद होत नाही. (मित्र = सखा, मित्र = सूर्य)
2. श्रीकृष्ण नवरा मी नवरी
    शिशुपाल नवरा मी न-वरी
3.सूर्य उगवला झाडीत
   झाडूवाली रस्ता झाडीत
   शिपाइ गोळ्या झाडीत
   अन् वाघहि तंगड्या झाडीत

अ) अर्थश्लेष अलंकार :

  • वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
  • उदा :
  • तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच

भाषेचे अलंकार व प्रकार :

ब) अर्थालंकार :

जेंव्हा दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून निर्माण होणार्या पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे निर्माण होणारा अलंकार हा अर्थालंकार असतो. बहुतेक अर्थालंकार हे अशा प्रकारच्या साम्यावरच आधारित असतात. भाषेचे अलंकार यांचा अभ्यास करताना अर्थालंकार यांचा अभ्यास महत्वाचा आहे.

1. उपमा :

  • जेंव्हा एखाद्या ठिकाणी उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन असते तेथे ‘उपमाहा अलंकार प्रकार निर्माण होत असतो. उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादातरी साधर्म्यसूचक असा शब्द असतो.
उदा :
  • सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी !
    स्पष्टीकरण : येथे सावळा रंग हे उपमेय आणि पावसाळी नभ हे उपमान.
  • आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे
    स्पष्टीकरण : परी, गत, सारखा किंवा तत्सम शब्द वापरून वस्तूंमधील सारखेपणा दाखविला जातो.

2. उत्प्रेक्षा अलंकार :

  • उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय हे जण उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्न असतो.
उदा :
  • ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू
    सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
  • तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या
    जणू दमल्या फार खेळूनी, मग निजल्या
  • नक्की वाचा : जोडशब्द व प्रकार

3. अपन्हुती अलंकार :

  • अपन्हुती म्हणजे लपविणे, झाकणे अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. “उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा अपन्हुतीहा अलंकार होतो.”
उदा :
  • हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल
    हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ
  • स्पष्टीकरण : प्रस्तुत उदाहरणात कमळातल्या पाकळ्याआणि शरदिचा चंद्रमाया उपमानांनी अनुक्रमे नयनआणि वदनया उपमेयांना नाकारल्यामुळे इथे अपन्हुतीअलंकार झालेला आहे.

4. रूपक अलंकार :

  • रूपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो. 
उदा :
  • ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा ||
    दावि मुख चंद्रमा सकळिकांसी ||

5. अतिशयोक्ती : 

  • जेंव्हा कोणतीही अशी कल्पना वास्तवात आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार निर्माण होतो.
उदा :
दमडीचं तेल आणलं,सासूबाईचं न्हाण झालं |
मामंजीची दाढी झाली,भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवले,लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला,त्यात उंट पोहून गेला ||

6. व्यतिरेक अलंकार  :

  • मराठी व्याकरणातील व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते व एक प्रकारचा व्यतिरेक दाखवलेला असतो.
उदा :
  • 1. अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा
  • 2. तू माउलीहुनी मायाळ चंद्राहूनी शीतळ
    पाणियाहूनी पातळ कल्लोळ प्रेमाचा

7. दृष्टांत अलंकार :

  • मराठी भाषेमध्ये जेंव्हा एखादे तत्त्व, एखादी गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी तसाच त्याला साजेसा किंवा तशाच प्रकारचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टान्तअलंकार निर्माण होतो. 
उदा :
  • लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ।
    ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ।।
  • स्पष्टीकरण : जगद्गुरू तुकाराम महाराज जेंव्हा परमेश्वराकडे लहानपण मागतात तर ते कशासाठी हे पटवून देताना मुंगी होऊन साखर मिळते आणि ऐश्वर्यसंपन्न ऐरावत हत्ती होऊन अंकुशाचा मार खावा लागतो अशी उदाहरणे हि दृष्टांत अलंकारामध्ये देतात.

8. स्वभावोक्ती :

  • एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन म्हणजेच स्वभावोक्ती अलंकार होय.
उदा :
  • 1. गणपत वाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच
    काडी म्हणायचा अन मनाशीच
    की या जागेवर बांधीन
    माडी मिचकावुनी मग
    उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई
    भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई
  • 2. मातीत ते पसरले अति रम्य पंख
    केले वरी उदर पांडुर निष्कलंक ॥
    चंचू तशीच उघडी पद लांबवीले
    निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ||

9. विरोधाभास अलंकार :

  • जेंव्हा एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शविला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार निर्माण होतो.
उदा :
  1. जरी आंधळी मी तुला पाहते.
  2. मरणात खरोखर जग जगते
  3. सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही

10. चेतनगुणोक्ती :

  • चेतनाचे गुण सांगणारी उक्ती म्हणजे चेतनगुणोक्ती हा मराठी भाषेचे अलंकार मधील अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. “जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा चेतनगुणोक्तीहा अलंकार होतो.”
उदा :
  • डोकी अलगद घरे उचलती
    काळोखाच्या उशीवरूनी
स्पष्टीकरण : काळोखाच्या उशीवरून (निर्जीव) घरे आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो.
  • चाफा बोलेना, चाफा चालेना
    चाफा खंत करी , काही केल्या फुलेना 

11. पर्यायोक्ती :

  • एखादी गोष्ट सरळसरळ न सांगता त्याएवची एखादा प्रातिनिधिक शब्द वापरून आडवळणाने सांगणे म्हणजेच पर्यायोक्ती अलंकार होय.
उदा :
  • त्याचे वडील सरकारी पाहुणचारघेत आहेत. (तुरुंगात आहेत)

12. भ्रान्तिमान अलंकार :

  • उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण करून दाखवणे म्हणजेच भ्रांतिमान अलंकार होय. 
उदा :
  • भृंगे विराजित नवी अरविंद पत्र
    पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे
    घालीन अंजन अशा मतिने तटाकी
    कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी
  • स्पष्टीकरण : भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.

13. ससंदेह :

  • उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित असतो.
उदा :
  • कोणता मानू चंद्रमा ?
    भूवरीचा की नभीचा?
    चंद्र कोणता वदन कोणते?

14. व्याजस्तुती :

  • बाह्यतः स्तुती आणि आतून निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन जेथे असते तेंव्हा व्याजमुक्ती अलंकार निर्माण होतो. 
उदा :
  • होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती |
    अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती? ||

अशाप्रकारे आपण वरीलप्रमाणे भाषेचे अलंकार व प्रकार यांचा अभ्यास केलेला आहे.

4 COMMENTS

  1. ज्या शब्दांपासून शेवट झाला आहे त्याच शब्दाने नव्या पंक्तीची सुरुवात झाली आहे,
    अशा प्रकारच्या अलंकाराला काय म्हणतात नाव मला ठाऊक नाही. आपल्याला माहित असेल तर जरूर कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here