शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार | मराठी व्याकरण

shabdanchya jati

शब्दांच्या जाती | Shabdanchya Jati

Contents hide
3 ब) क्रियापद ( अविकारी )

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मराठी व्याकरण या घटकामध्ये शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार या घटकावर हमखास दोन ते तीन प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जातात. या प्रश्नांची तयारी करण्यासाठी शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार यांचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे. शब्दांच्या मुख्यतः दोन जाती असतात.

अ) विकारी शब्द  ब) अविकारी शब्द

अ) विकारी शब्द –

  • जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या रुपात बहुधा कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो. त्यांना विकारी शब्द असे म्हणतात.

ब) अविकारी शब्द –

  • ज्या शब्दांचा वाक्यात केव्हाही, कोणत्याही प्रकारचा बदल न होता उपयोग होतो, त्याना अविकारी शब्द म्हणतात.

अ) विकारी शब्द

विकारी नामांमध्ये तीन प्रकार आहेत

अ) नाम

  1. सामान्य नाम
  2. विशेष नाम
  3. भाववाचक नाम

ब) सर्वनाम

  1. पुरुषवाचक सर्वनाम
  2. दर्शक सर्वनाम
  3. संबंधी सर्वनाम
  4. सामान्य सर्वनाम
  5. आत्मवाचक सर्वनाम

क) विशेषण

  1. गुणवाचक विशेषण
  2. संख्यावाचक विशेषण
  3. धातुसाधित विशेषण
  4. सार्वनामिक विशेषण
  5. अधि/विधि विशेषण

ब) क्रियापद ( अविकारी )

  • मराठी व्याकरणामध्ये क्रियापदाचे दोन प्रकार आहेत

1. सकर्मक क्रियापद   2. अकर्मक क्रियापद

  • त्याशिवाय मराठी व्याकरणात क्रियापदाचे आणखी प्रकार आहेत.

1.शक्य क्रियापद 2.प्रयोजक क्रियापद 3.संयुक्त व सहाय्यक क्रियापद

मराठी व्याकरणानुसार शब्दांची कार्ये आठ आहेत. म्हणजे शब्दांच्या जाती (कार्य) आठ आहेत.
  1. नाम
  2. सर्वनाम
  3. विशेषण
  4. क्रियापद
  5. क्रियाविशेषण अव्यय
  6. शब्दयोगी अव्यय
  7. उभयान्वयी अव्यय
  8. केवलप्रयोगी अव्यय
यापैकी पहिल्या चार जाती विकारी शब्दांच्या असून पुढच्या चार अविकारी शब्दांच्या जाती आहेत.

विकारी शब्दांच्या जाती – अ) नाम आ) सर्वनाम इ) विशेषण ई) क्रियापद

अ) शब्दांच्या जाती – नाम

  • नाम – नाम म्हणजे कोणत्याही वस्तूला दिलेले नाव.

नामांचे मुख्य प्रकार तीन – अ) सामान्यनाम व) विशेषनाम क) भाववाचकनाम

अ) सामान्य नाम –
  • जे नाम एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडते, ते सामान्यनाम
  • उदा : पर्वत, मुलगी, घर, शाळा, फळ, फूल, गाय, घोडा, टेवल, खुची इ.
ब) विशेषनाम –
  • जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते, ते विशेषनाम.
  • उदा : सलोख, स्नेहल, हिमालय, गंगा, कपिला इ.
क) भाववाचक नाम –
  • ज्या नामामुळे, प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा, भावाचा किंवा धर्माचा बोध होतो, ते भाववाचक नाम.
  • उदा : प्रामाणिकपणा, गोडी, धूर्तपणा, शौर्य, निर्भयता, कारुण्य इ.

आ) शब्दांच्या जाती – सर्वनाम

सर्वनामे - स्वतःचा असा काही विशेष अर्थ नसून सर्व नामांच्या बद्दल उपयोगात येणारा जो विकारी शब्द त्यास सर्वनाम असे म्हणतात.
  • सर्वनामाचे अर्थदृष्टया प्रकार सहा आहेत .

(अ) पुरुषवाचक सर्वनाम

(ब) दर्शक सर्वनाम

(क) संबंधी सर्वनाम

(ड) प्रश्नार्थक सर्वनाम

(इ) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम

(फ) आत्मवाचक सर्वनाम.

  • मराठी व्याकरणामध्ये एकंदर सर्वनामे नऊच आहेत .
  • मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः
अ) पुरुष वाचक सर्वनाम – तीन प्रकार आहेत.

१) प्रथम पुरूषवाचक सर्वनाम

२) द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम

३) तृतीय पुरूषवाचक सर्वनाम.

१) प्रथम पुरूषवाचक सर्वनाम –
  • बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेली सर्वनामे
  • उदा. – मी, आम्ही, आपण, स्वतः व त्यांची विभक्ती प्रत्यये.
२) द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम –
  • बोलणारी व्यक्ती ज्यांच्याशी बोलते, त्यांच्या विषयी वापरलेली सर्वनामे.
  • उदा. – तू, तुम्ही, आपण, स्वतः व त्यांची विभक्ती प्रत्यये.
३) तृतीय पुरूषवाचक सर्वनाम –
  • बोलणारी व्यक्ती ज्यांच्या विषयी बोलते त्यांच्या विषयी वापरलेली सर्वनामे.
  • उदा. – तो, ती, ते, त्या, ती व त्यांची विभक्ती प्रत्यये.
ब) दर्शक सर्वनाम –
  • विशेषतः वस्तू जवळ असल्यास लिंग भेदाप्रमाणे ‘हा, ही, हे, ह्या, ही सर्वनामे वापरतो. पण वस्तू दूर असल्यास “तो, ती, ते, त्या’ ही सर्वनामे वापरतो. ही सर्वनामे वापरताना आपण ते पदार्थ दर्शवितो किंवा दाखवितो म्हणून त्याना दर्शक सर्वनामे असे म्हणतात.
क) संबंधी सर्वनामे –
  • ‘जो, जी, जे, ज्या, ह्या सर्वनामांचा संबंध त्याच वाक्यात पुढे येणाऱ्या ‘तो, ती, ते, त्या,’ यादर्शक सर्वनामाशी असतो. म्हणून ‘जो, जी, जे, ज्या’ या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात.

उदा :

  1. जो अभ्यास करतो तो परीक्षेत पास होतो.
  2. जे चकाकते ते सारे सोने नसते.
  3. जी कविता लिहिते ती कवयित्री होते.
ड) प्रश्नार्थक सर्वनाम –
  • वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरलेली सर्वनामे. कोण, काय, कोणास, कोणाचा, कोणी यामुळे प्रश्न विचारता येतो. म्हणून ही प्रश्नार्थक सर्वनामे होय.
ई) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम –
  • प्रश्नार्थक वाक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरलेली कोण, कोणास, काय ही सर्वनामे कोणत्या नामाबद्दला वापरलेली आहेत हे निश्चित सांगता येत नाही. म्हणून अशा ‘कोण व काय’ या सर्वनामांना अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणतात.

उदा :

  1. मिलापच्या पिशवीत काय आहे ते पाहूया.
  2. तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, स्नेहलचे उत्तर तयार असते.
  3. आंबा कोणी खाल्ला ते माहीत नाही.
फ) आत्मवाचक सर्वनाम – स्वतः व आपण ही सर्वनामे.

उदा :

  1. मी स्वतः अभ्यास करणार.
  2. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही.
  3. आपले काम आपणच करावे.
  4. तुम्ही स्वतः चहा घ्या.
  5. त्यानी स्वतः मिलापला बोलावले.
  6. तुम्ही आपल्या घरी जा.
  7. त्यानी आपले पुस्तक बदलले आहे. 

आपण‘ ह्या सर्वनामाचा प्रथम पुरुषवाचक व द्वितीय पुरुषवाचक याप्रमाणे उपयोग करणे व आत्मवाचक याप्रमाणे उपयोग करणेयात फरक आहे. जेव्हा ते ‘आम्ही किंवा तुम्ही’ या अर्थाने येते, तेव्हा ते अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरुषवाचक असते. व ‘स्वतः” या अर्थी येते तेव्हा ते आत्मवाचक असते.

इ) शब्दांच्या जाती – विशेषण

विशेषण – मराठी व्याकरणात नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. म्हणजे नामांचा कोणत्या तरी प्रकारचा गुण किंवा वैशिष्टय दाखविणारा जो विकारी शब्द त्याला विशेषण म्हणतात. विशेषणे ही कशाचीही नावे नसतात. विशेषणे एकाकी कधीच येऊ शकत नाहीत. कधीकधी नाम नसताना विशेषण एकाकी येते. तेव्हा तेच नाम होते. विशेषण हे नामाला जोडून नामाच्या आधी येते.

  • विशेषणे चार प्रकारची असतात.

अ) गुणवाचक विशेषण –

  • नामांचे गुण किंवा विशेष दाखविणाऱ्या अशा विशेषणांना ‘गुणवाचक विशेषणे’ म्हणतात.
  • उदा. – चांगला मुलगा, पांढरी टोपी, कडू कारले, पिवळी केळी.
  • चांगला, पांढरी, कड, पिवळी ही विशेषणे त्यांच्या पुढे येणारी नामे कशा प्रकारची आहेत हे सांगतात.

ब) संख्यावाचक विशेषण –

  • ही विशेषणे नामाची संख्या दर्शवितात. त्यात तीन प्रकार आहेत.
१) गणनावाचक संख्या विशेषण –
  • काही गणनावाचक संख्या विशेषण निश्चित संख्या, अनिश्चित संख्या किंवा परिमाण ही दाखवितात.

उदा : वीस मुले, पंचवीस पुस्तके, दहा फळे, पाच पाने. यात वीस, पंचवीस,दहा, पाच ही निश्चित संख्या होय.काही मुले, थोडे तांदूळ, पुष्कळ मुंग्या, यात काही, थोडी, पुष्कळ ही अनिश्चित संख्या होय.

२) क्रमवाचक संख्या विशेषण –
  • यामध्ये वस्तूंचा क्रम दाखविला जातो.

उदा : पहिला क्रमांक, चौथा मुलगा, आठवा वाक. यात पहिला, चौथा,आठवा ही क्रमवाचक संख्या विशेषण होय.

३) आवृत्तीवाचक संख्या विशेषण –
  • यामध्ये  संख्येची किती आवृत्ती झाली हे कळते.

उदा : दुप्पट मोठा, तिप्पट उंची, दसपट पुस्तके. यात दुप्पट, तिप्पट, दसपट ही आवृत्तीवाचक संख्या विशेषणे होय.

क) सार्वनामिक विशेषण –

  • सर्वनामापुढे त्याची नामे लगेच आलेली असतात. अशी ही सर्वनामे विशेषणे होतात. सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात.
  • उदा : माझे घर, तुझी शाळा, त्यांचे मित्र, येथे माझे, तुझी, त्यांचे ही सार्वनामिक विशेषणे होय.

ड) धातुसाधित विशेषण –

  • धातू पासून कृदंत रुपे बनतात. काही कृदंत रुपांचा वाक्यात विशेषणासारखा उपयोग होतो. त्यानाधातूसाधित विशेषणे म्हणतात.

उदा : 

  1. त्याचा चेहरा बोलका वाटतो. (बोलणे)
  2. आम्ही सिंहगडला चालत चालत गेलो. (चालणे).
  3. कोकिळा गात आहे. (गाणे)
  • बोलका, चालत, गात ही धातुसाधित विशेषणे होय.
  • टीप – कृदंत – धातुपासून तयार झालेले रुप, यालाच कृदंत म्हणतात. गा धातूपासून गाणे, गान, गाता, गाताना, गाऊ, गाऊन, गाणारा अशी कृदंत रुपे तयार होतात.
  • नकी वाचा  : मराठी म्हणी व वाक्प्रचार

ई) शब्दांच्या जाती – क्रियापद

क्रियापद – क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. क्रियेचा काळ आणि विशेष अर्थ यांचा पूर्ण बोध होतो. तसेच ह्या क्रियावाचक शब्दामुळे वाक्ये पुरी होतात. म्हणून ह्या विकारी शब्दास क्रियापद असे म्हणतात.

  • क्रियापदाचे एकूण सहा प्रकार आहेत –

(अ) सकर्मक क्रियापद

(ब) अकर्मक क्रियापद

(क) संयुक्त क्रियापद

(ड) सहाय्यक क्रियापद

(ई) प्रयोजक क्रियापद

(फ) शक्य क्रियापद

(अ) सकर्मक क्रियापद –
  • ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरूरी असते, त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात.

उदा :

  1. रामू भाजी विकतो –

स्पष्टीकरण : विकणारा कोण ? रामू. म्हणून रामू हा कर्ता. विकण्याची क्रिया कोणावर घडते ? भाजी या शब्दावर, म्हणून भाजी हे कर्म, रामू विकतो या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्याला पूर्ण होण्यास ‘भाजी’ या कर्माची जरूरी आहे. म्हणून ‘विकतो‘ हे सकर्मक क्रियापद आहे.

ब) अकर्मक क्रियापद –
  • ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरूरी नसते, त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात.

क) संयुक्त क्रियापद –

  • कधी कधी क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या रुपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. या दोन्ही क्रियापदांच्या संयोगाने जे क्रियापद तयार होते त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात.
ड) सहायक क्रियापद –

तसेच त्या मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या रुपाला जोडून जे दुसरे क्रियापद येते, त्याला सहायक क्रियापद किंवा सहायकारी क्रियापद म्हणतात.

  • मुख्य क्रिया दर्शविणारे रूप + सहायक क्रियापद = संयुक्त क्रियापद

उदा : कावळा झाडावर ओरडत आहे.

स्पष्टीकरण : या वाक्यात ‘ओरडत‘ या धातुसाधिताला ‘आहे‘ या क्रियापदाने सहाय केले आहे. पण ह्या संयुक्त क्रियापदाने एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे.

इ ) प्रयोजक क्रियापद –

जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करवितो, तेव्हा ती क्रिया दाखविणारे क्रियापद हे ‘प्रयोजक’ क्रियापद असते.

उदा : नेहा बहिणीला हसविते.

स्पष्टीकरण : या  वाक्यात नेहा स्वतः हसत नसून हसण्याची क्रिया बहिणीकडून करविते. तसेच पाडतो, रडविते, आणवितो, करवितो, ही प्रयोजक क्रियापद होय.

फ) शक्य क्रियापद –

जेव्हा एखाद्या क्रियापदावरुन कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य आहे असा बोध होतो. अशा क्रियापदांना ‘शक्य क्रियापदे’ म्हणतात.

उदा : 

  1. त्याला आता खूप चालवते.
  2. मला आता दुकानापर्यंत जाववते.

स्पष्टीकरण : चालवते व जाववते ही शक्य क्रियापदे होय. कारण येथे क्रियेवरून शक्यतेचा किंवा समर्थतेचा अर्थ कळत असल्यामुळे क्रिया चालवणारा कोण ? किंवा जाणारा कोण ? असे विचारण्याची अपेक्षा नसून चालण्याची किंवा जाण्याची शक्ती असणारे कोण ? ह्या अर्थाच्या प्रश्नानेच अपेक्षित व योग्य उत्तर निघते.

अविकारी शब्दांचे प्रकार

मराठी व्याकरणामध्ये अविकारी शब्दांचे चार प्रकार आहेत.

उ) क्रिया विशेषण अव्यय

ऊ) उभयान्वयी अव्यय

ए) शब्दयोगी अव्यय

ऐ) केवलप्रयोगी अव्यय

उ) शब्दांच्या जाती – क्रिया विशेषण अव्यये

१) क्रिया विशेषण अव्यये –

क्रियेचे स्थल, काल, रीति, संख्या इ. कोणत्याही प्रकारचे वैशिष्टय दाखविणारा जो अविकारी शब्द आहे त्याला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियाविशेषण अव्यय अर्थदृष्टी सामान्यतः चार प्रकारची आढळतात

  • अ) स्थलवाचक
  • ब) कालवाचक
  • क) रीतिवाचक
  • ड) परिमाणवाचक किंवा संख्यावाचक.
अ) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये –
  • क्रिया कोठे घडली, तिचे स्थळ किंवा ठिकाण दर्शविणारा शब्द.

उदा : 

  1. येथे खेळू नका.
  2. आमची शाळा घरापासून जवळ आहे.

स्पष्टीकरण : येथे, तेथे, पलीकडे, सभोवार, वर, खाली, आत, माग, पुढे इ. शब्द त्यांच्या वाक्यातील क्रिया कोठे घडते या बदलची विशेष माहिती सांगतात.

ब) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय –

  • क्रिया घडण्याचा काळ दाखविणारे शब्द.

उदा : 

  1. हल्ली दहिसरला विजेचे दिवे आलेले आहेत.
  2. गोकर्णला पूर्वी मातीचे रस्ते होते.
  3. दिवाळीत मुले आठवडाभर फटाके वाजवितात.
  4. आम्ही वारंवार समुद्रावर फिरायला जातो.

स्पष्टीकरण : केव्हा? हा प्रश्न क्रियापदास विचारल्यास – आज, उद्या, यंदा, जेव्हा, महिनाभर, वारंवार, आता, पूर्वी, मागे, सकाळी, रात्री, नेहमी, पुन्हा, दररोज, वेळोवेळी, क्षणोक्षणी इ. उत्तरे मिळू शकतात.

क) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये –
  • क्रिया घडण्याची रीत दाखविणारे शब्द. कसा? कशी? कसे? या प्रश्नानी क्रियापदाकडून येणारी उत्तरे.

उदा : असे, तसे, जलद, सावकाश, हळूहळू, आपोआप, झटपट, खरोखर, खचित, उगीच, फुकट, मुद्दाम, व्यर्थ

  1. मी सावकाश जेवते.
  2. तो चटकन दुकानात जाऊन आला.
  3. सलोख फार जलद चालतो.
ड) परिमाणवाचक (किंवा संख्या वाचक) क्रियाविशेषण अव्यये –
  • क्रिया किती प्रमाणात घडली, हे सांगणारे परिमाणवाचक शब्द. किती? या प्रश्नाने क्रियापदाकडून येणारे उत्तर.

उदा : किंचित, अत्यंत, थोडा, मुळीच, भरपूर, अतिशय, काहीसा, जरा, पूर्ण, विलकुल, कमी, अधिक, इ.

  1. सलोख मुळीच झोपला नाही.
  2. मिलापने पारिजातकाची भरपूर फुले आणली.

ऊ) शब्दांच्या जाती – उभयान्वयी अव्यय

  • दोन शब्द किंवा दोन वाक्ये याना केवळ जोडण्याचे काम करणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये म्हणतात. ही अव्यये दोन वाक्ये जोडण्याचे कार्य करतात.

उदा : त्यासाठी, आणि, व, शिवाय, अन्, परंतु, पण, अथवा, किंवा, वा, म्हणून, कारण, की, म्हणजे, तर, जर, तरी, यासाठी, इ. शब्दांचा वापर करतात.

१) स्नेहल लक्षदेऊन अभ्यास करते म्हणून तिचा पहिला नंबर येतो.

स्पष्टीकरण : येथे म्हणून हे उभयान्वयी अव्यय वापरण्यात आले आहे.

ऊ) शब्दांच्या जाती – शब्दयोगी अव्यये

  • नाम किंवा दुसरा एखादा विकारी शब्द त्याला जोडून येऊन त्याचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
  1. तो झाडावर आहे.
  2. दिव्याखाली बसून वाचू नये.

ऐ) शब्दांच्या जाती – केवलप्रयोगी अव्यय

मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना उद्गारवाचक अव्यय किंवा केवलप्रयोगी अव्यययांचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. मनाला एकाएकी होणारे हर्ष, शोक, तिरस्कार, आश्चर्य इ. विकार दर्शविण्यासाठी जे शब्द एकदमउच्चारले जातात, अशा अविकारी शब्दांना केवल प्रयोगी किंवा उद्गार वाचक अव्यये असे म्हणतात. आपल्या मनात जितक्या प्रकारच्या भावना उद्भवतात तितके त्यांचे प्रकार संभवतात.

  1. हर्षदर्शक – वाहवा, अहाहा, वा वाः अहा, आहो.
  2. शोकदर्शक – अरेरे, अगाई, हायहाय, शिवशिव, रामराम, देवा रे, आई आई.
  3. आश्चर्यदर्शक – अबब, अरे बापरे, अय्या, अगवाई.
  4. विरोधदर्शक – छे, हट्ट, अंहं, उहूं, छी, छी छी.
  5. तिरस्कारदर्शक – छी, थू, शी, इश्क, अहाहा.
  6. प्रशंसादर्शक – वाहवा, शाबास, भले, ठीक.
  7. स्वीकारदर्शक (संमतीदर्शक) -जी, हां. ठीक. वरे, होय.
  8. संवोधनदर्शक – अरे, अहो, अग, ए, रे.

सारांश | Conclusion : 

मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती किती आहेत? शब्दांच्या जातींचे प्रकार कोणकोणते आहेत? या व अशा सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या लेखाच्या अभ्यासातून आपण नक्कीच देऊ शकतो. शब्दांच्या जाती आणि त्यांचा मराठी भाषेमध्ये होणारा उपयोग, क्रियापद व क्रियापदाचे प्रकार, विशेषण व विविध अव्यय आपण या थिअकनि अभ्यासली आहेत. अशापाकारे आपण मराठी व्याकरणामध्ये अत्यंत महत्वाचा असलेला शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार या भागाबद्दल माहिती याठिकाणी अभ्यासली.

19 COMMENTS

  1. […] शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार पहा. […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here