क्रियापद व त्याचे प्रकार | Verb and its type in Marathi

kriyapad v tyache prakar
kriyapad v tyache prakar

क्रियापद व त्याचे प्रकार

Contents hide

मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना क्रियापद व त्याचे प्रकार यांचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टिकोनामधून फार आवश्यक आहे, त्यासाठीच आपण मराठी भाषेमधील क्रियापद व त्याचे प्रकार | kriyapad v tyache prakar हा भाग अभ्यासणार आहोत.

क्रियापद व त्याचे प्रकार :

व्याख्या :

मराठी व्याकरणामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यसाठी वापरला जाणारा विकारी शब्द = ‘क्रियावाचक शब्द‘ होय. चला तर क्रियापद व त्याचे प्रकार यांचा आढावा घेऊया !

उदा : 

  • केले, करतो, बसला, लिहितो, खातो, शिकते, खेळतात’ ही क्रियापदे किंवा क्रियावाचक शब्द आहेत.
  • देणे, करणे ही क्रियापदे नसून क्रियावाचक नामे आहेत.

व्याकरणामध्ये ‘अस‘ या धातूने क्रिया दर्शवली जाते तर ‘हो’ या धातूने क्रीयेमधील स्थित्यंतर दाखविले जाते, अशा शब्दानासुद्धा व्याकरणात क्रियापदे असे म्हणतात.

नक्की वाचा : 1.समानार्थी शब्द 2.विरुद्धार्थी शब्द

धातुसाधिते ( कृदन्ते ): 

मराठी भाषेमध्ये क्रियापद व त्याचे प्रकार | kriyapad v tyache prakar अभ्यासताना क्रियापदातील प्रत्ययरहित जो मूळ शब्द असतो त्याला धातू असे म्हणतात. आणि धातूपासून जो शब्द तयार होतो त्याला धातुसाधिते किंवा कृदन्ते असे म्हणतात.

व्याकरणामध्ये धातुसाधीते हि वाक्याच्या शेवटी कधीच येत नाही ते वाक्याच्या सुरूवातीला किंवा वाक्याच्या मध्ये येत असतात. धातुसाधिते वाक्यामध्ये धातुसाधीते नाम, विशेषण किंवा क्रियाविशेषणाचे काम करतात.

मराठी भाषेमधील धातूंना जोडल्या जाणा-या प्रत्ययाना संस्कृत भाषेमध्ये कृदंत प्रत्यय असे म्हणतात. ”ज्याच्या अंती केवळ क्रियादर्शक प्रत्यय आहे असा शब्द म्हणजेच कृदंत होय”. व्याकरणामध्ये फक्त संयुक्त क्रियापदातच धातुसाधीते क्रियापदाचे काम करते.

धातुसाधिते : 
  • करून, बसता, लिहून, खतांना, खाणारी, लिहितांना, बोलतांना,चालताना

उदाहरणार्थ :

  1. धावणे आरोग्यासाठी चांगले असते. (वाक्यामध्ये धावणे = धातुसाधीत, असते = क्रियापद)
  2. नाव समुद्रात बुडतांना त्यांनी पाहिली. (वाक्यामध्ये बुडतांना = क्रियाविशेषण, बुडतांना = धातुसाधीते, पाहिली = क्रियापद)
  3. ती पुस्तक वाचताना अचानक थांबली.
  4. तो खेळताना हसला.

वरील वाक़्यामध्ये येणारी ‘वाचताना’, ‘खेळताना’ ही धातूपासून तयार झालेली रुपे असून हि त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून त्यांना क्रियापद असे न म्हणता धातुसाधिते म्हणतात.

कर्ता व कर्म : 

  • वाक्यामध्ये क्रिया करणारा हा कर्ता असतो व ज्याच्यावर क्रिया घडली त्याला कर्म म्हणतात.
  • व्याकरणामध्ये वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणारा असतो, त्यास कर्ता असे म्हणतात.
  • वाक्यातील क्रियापदाने केलेली एखादी क्रिया कर्त्यापासून निघते व ती दुस-या कोणावर तरी किंवा कशावर तरी घडते. क्रियापदाने केलेल्या क्रियेचा परीणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे त्या क्रियेचा रोख किंवा कल असतो ते त्याचे कर्म असते.

वाक्यातील कर्ता व कर्म कसे शोधतात ?

  • एखाद्या वाक्यामधील कर्ता शोधताना सर्वप्रथम त्या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा लागतो व त्याला ‘णारा‘ हा प्रत्यय लावून कोण ? असा वाक्यामध्ये प्रश्न केल्यावर वाक्यातील कर्ता मिळतो.

उदा :

  • 1. प्रवीण सफरचंद खातो.

स्पष्टीकरण : वरील वाक्यातील मूळ धातू ‘खा’ आहे. त्याला ‘णारा’ हा प्रत्यय लावल्यास खाणारा असा शब्द तयार होतो, तर प्रवीण सफरचंद खातो या वाक्याला खाणारा कोण ? असा प्रश्न केल्यावर प्रवीण हे उत्तर मिळते म्हणून या वाक्याचा कर्ता हा प्रवीन आहे. तर खाण्याची क्रिया हि सफरचंदावर घडून आलेली आहे म्हणून सफरचंद हे या वाक्याचे कर्म आहे.

उदा :

  • 2. शाम कुत्र्याला मारतो.

स्पष्टीकरण : वरील वाक्यातील मूळ धातू मार, त्याला णारा प्रत्यय लावल्यास मारणारा हा शब्द तयार झालेला आहे तर मारणारा कोण? असा प्रश्न वाक्याला विचारल्यास उत्तर शाम येते म्हणून या वाक्याचा कर्ता शाम तर मारण्याची क्रिया हि कुत्र्यावर घडत असल्यामुळे या वाक्याचे कर्म कुत्रा आहे.

उदा :

  • 3. राहुल चतुर आहे.

स्पष्टीकरण : वरील वाक्यातील मूळ धातू ‘अस’ आहे. वाक्याला असणारा कोण ? असा प्रश्न केल्यास उत्तर राहुल येते म्हणून या वाक्याचा कर्ता हा राहुल असून असण्याची क्रिया राहुलवरच घडते म्हणजेच क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही म्हणून या वाक्यात कर्म उपलब्ध नाही. आहे हे क्रियापद अकर्मक क्रियापद आहे.

  1. राजाला मुकुट शोभतो. शोभणारा कोण ? – मुकुट. मुकुट हा कर्ता.
  2. मला सूर्य दिसतो. दिसणारा कोण ? – सूर्य. सूर्य हा कर्ता आहे.
''मराठी व्याकरणामध्ये क्रिया करणारा हा कर्ता असतो व ती क्रिया भोगणारे किंवा सोसणारे हे कर्म असते.''

क्रियापद व त्याचे प्रकार :

  • क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत.
  1. सकर्मक क्रियापद
  2. अकर्मक क्रियापद

सकर्मक क्रियापद : 

  • एखाद्या वाक्यामध्ये ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते, त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. सकर्मक क्रीयापदामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्याला अकर्मक क्रियापद आसे म्हणतात.
वाक्यकर्ताकर्मक्रियापद
१.सुरज सफरचंद खातो.सुरजसफरचंदखातो
२.शितल दुध पिते.शितलदुधपिते.
3.शाम निबंध लिहतो.शामनिबंधलिहतो.

अकर्मक क्रियापद : 

  • मराठी व्याकरणामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या वाक्यातील क्रियापदाला कर्माची गरज नाही त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. अकर्मक क्रीयापादामध्ये कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असते किंवा कर्त्यांच्या ठिकाणी लय पावत असते.
वाक्यकर्ताक्रियापद
१.सुरज गातो.सुरजगातो.
२.सानवी रडते.सानवीरडते.
३.राम हसतो.रामहसतो
४.सुनील गोतो.सुनीलगातो.

व्दिकर्मक क्रियापद : 

मराठी व्याकरणामध्ये केंव्हा केंव्हा वाक्यामध्ये कर्त्यापासून निघालेल्या दोन क्रिया दोन कर्मावर परिणाम करतात किंवा वाक्यातील क्रिया पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते. तेव्हा अशा क्रियापदाला व्दिकर्मक क्रियापद असे म्हणतात.

उदाहरणार्थ :

  1. गुरुजी समीरला भूगोल शिकवितात.
  2. राजूने सुनीलला गोष्ट सांगितली.
  3. त्याने भिका-याला पैसा दिला.

स्पष्टीकरण : वरील उदाहरणांमध्ये वाक्यांतील शिकवितात, सांगितली, दिला ही क्रियापदे सकर्मक आहेत व त्यांना दोन कर्मे आहेत. पहिल्या वाक्यात गुरुजी हा कर्ता तर शिकविण्याची क्रिया भूगोल व समीर या दोघांवर घडले. तीच गोष्ट सांगितली व दिला या क्रियापदांच्या बाबतीतही आहे. या क्रियापदांना दोन कर्मे लागतात. अशा क्रियापदाना व्दिकर्मक क्रियापदे असे म्हणतात. वरील वाक्यातील वस्तुवाचक कर्मांना प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात आणि व्यक्तिवाचक कर्माना अप्रत्यक्ष कर्म असे म्हणतात.

  • वरील वाक्यातील भूगोल, गोष्ट, पैसा ही प्रत्यक्ष कर्म व समीर, सुनीलला व भिका-याला ही अप्रत्येक्ष कर्म होत. मराठी व्याकरणामध्ये प्रत्यक्ष कर्माची विभक्ती व्दितिया असते तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती संप्रदानी चतुर्थी असते.

उभयविध क्रियापद : 

भाषेमध्ये क्रियापद व त्याचे प्रकार अभ्यासताना जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरात येते अशा क्रीयापादास ‘उभयविध क्रियापद’ असे म्हणतात. काप, आठव, स्मर, लोट हे धातू या प्रकारचे होत.

उदाहरणार्थ :

  1. त्याचे नाणे हरविले.
  2. अनिलने माझे नाणे हरविले.

स्पष्टीकरण : वरील दोन्ही वाक्यात हरविले हे क्रियापद आहे पण पहिल्या वाक्यात नाणे हा कर्ता असून दुसऱ्या वाक्यात अनिलने हा कर्ता आहे व नाणे हे कर्म आहे याचा अर्थ हरविले हे क्रियापद दोन्ही वाक़्यामध्ये अकर्मक व सकर्मक किंवा कर्मासहित व कर्माशिवाय दोन्ही प्रकारे वापरले गेले आहे.

अपूर्ण विधान क्रियापद : 

मराठी व्याकरणामध्ये क्रियापद व त्याचे प्रकार यांचा अभ्यास करताना जेव्हा वाक्यात क्रियापद उपस्थित असूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तेव्हा अशा क्रियापदास ‘अपूर्ण विधान क्रियापद’ असे म्हणतात. अशावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी क्रियापदाव्यतिरिक्त ज्या शब्दांची गरज असते त्याला ‘विधान पूरक’ किंवा ‘पूरक’ असे म्हणतात. अकर्मक क्रियापद असताना ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी विधानपूरकाची आवश्यकता असते. अशा क्रियापदांना आपण अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.

  • काही ठिकाणी अकर्मक धातू असे आहेत कि कर्ता व क्रियापद असूनही त्या वाक्याचा अर्थ अपुरा असतो.

उदा :

  1. राधिका यंदा इंजिनियर झाली.

स्पष्टीकरण : वरील वाक्यामध्ये राधिका ही कर्ता आहे. परंतु या वाक्यामध्ये कर्म नाही वरील वाक्यामधून इंजिनिअर हा शब्द काढला तर राधिका यंदा झाली. या शब्दा पासून वाक्याचा काही अर्थबोध/अर्थपूर्ण होत नाही. थोडक्यात वाक्यातील झाली हे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ आहे त्यामुळेच वरील वाक्यात राधिका हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास पूरक किंवा आवश्यक ठरतो. अशा वाक्याच्या विधानपुरक आवश्यकता असणाऱ्या क्रियापदाला व्याकरणामध्ये अपूर्ण विधान क्रियापद असे म्हणतात.

उदा :

  1. शाम झाला.
  2. मुलगी आहे.
  3. पेरू निघाला.

स्पष्टीकरण : वरील वाक्यामध्ये झाला, आहे, निघाला ही क्रियापदे अपु-या विधानांची आहेत. अशा प्रकारच्या येणाऱ्या क्रियापदाना व्याकरणामध्ये अपूर्ण विधान क्रियापदे असे म्हणतात. ती विधाने पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची जरुरी असते.

अकर्मक धातु : 

वाक्यामधील स्थितीवाचक , गतीवाचक , वस्तुस्थितीदर्शक , स्थित्यंतरवाचक धातू अकर्मक असतात तर कृतीवाचक धातू हे सकर्मक असतात.

उदा :

झोप, थरथर, कुडकुड, रड, पड, सड, मर, सर, उड वाढ, झड, जळ, किंचाळ, तुट, सुट, पहुड, उजळ, प्रकाश, ओरड, घोर, सळसळ, धडपड, चुरचुर, भुकेज, कीड,अस, नस, हो, नहो, उठ, बस, नीज, धाव, थांब, शक, थक, जाग, झीज, , राह, वाह, फुल, उमल, उपज, निपज, जन्म, पिक, लोळ, वाज, भीज, शीज, सुज, वीझ, रूज, बिघड इत्यादी.

संयुक्त व सहायक क्रियापद : 

मराठी व्याकरणामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातूसाधिताला सहकार्य करते त्या क्रियापदाला संयुक्त किंवा सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. किंवा धातुसाधित व सहायक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदाना संयुक्त क्रियापद असे म्हणतात. संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया हि एकच असायला हवी.

उदा :

  1. मैदानावर मुले खेळू लागली.
  2. सुधीर, एवढा आंबा खाऊन जा.

स्पष्टीकरण : वरीलपैकी पहिल्या वाक्यात खेळू लागलीतसेच दुस-या वाक्यात खाऊन जा ही संयुक्त क्रियापदे आहेत कारण खेळू लागली या क्रियापदातून खेळण्याची एकच क्रिया दाखवली आहे त्याचप्रमाणे खाऊन जा या क्रियापदातून खाण्याची एकच क्रिया स्पष्ट होते. वरीलपैकी पहिल्या वाक्यात खेळू हे धातुसाधित आहे टर लागली हे मुख्य क्रियापद आहे तर दुस-या वाक्यात खाऊन हे धातुसाधित असून ‘जा’ हे मुख्य क्रियापद आहे.

सिद्ध व साधित क्रियापद : 

मराठी व्याकरणामध्ये क्रियापद व त्याचे प्रकार यांचा अभ्यास करत असताना विविध प्रकारच्या शब्दांपासून ( धातूंपासून ) तयार होणा-या धातूंना साधित धातू असे म्हणतात व ”साधित धातूंपासून बनलेल्या क्रियापदाना साधित क्रियापदे असे म्हटले जाते.” जेव्हा नामे, विशेषणे, क्रियापदे व अव्यये इत्यादीना प्रत्यय लागून क्रियापदे तयार होतात व त्यांचा उपयोग वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी केला जातो त्याला साधित क्रियापदे म्हणतात. 

  • वाक्यामध्ये जेंव्हा जा, ये, कर, ऊठ, बस, असे हे मुळचे धातू आहेत. त्यांना सिद्ध धातू असे म्हणतात व या सिद्ध धातूंना प्रत्यय लावून बनविलेल्या क्रियापदाना सिद्ध क्रियापदे असे म्हणतात. जेंव्हा शब्दाच्या मुळधातूंना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात त्यांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात.

उदा :

  1. माझ्या शेतातील अवजारे तो नेहमी हाताळतो.
  2. सईबाईच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले.

स्पष्टीकरण : हाताळतो, पाणावले ही क्रियापदे हाताळ, पानाव या धातूंपासून बनली आहेत या धातूंना साधित धातू असे म्हणतात. तर या साधित धातूंना प्रत्यय लागून हाताळतो, पाणावले ही क्रियापदे बनली आहेत त्यांना सिद्ध क्रियापदे असे म्हणतात.

 प्रायोजक क्रियापद : 

मराठी व्याकरणातील क्रियापद व त्याचे प्रकार यांचा अभ्यास करताना प्रायोजक क्रियापदांचा परीक्षेच्या दृशिकोनातून अभ्यास करणे महत्वाचे आहे.साधित धातूवरून प्रायोजक व शक्य क्रियापदे बनत असतात.

व्याख्या : वाक्यामध्ये जेंव्हा मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता हा क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुस-या कोणाला तरी करावयास लावत आहे असा जेंव्हा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. जेव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदाचा कर्ता हा घडणारी क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेरणेने करतो किंवा कर्त्याला दुसरा कोणीतरी ती क्रिया करण्यास प्रेरित किंवा प्रोत्साहित करतो असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.

उदा :

  1. तो मुलांना खेळवितो.
  2. आई बाळाला निजविते.
  3. तो गुरे चारतो.
  4. राजू मित्राला शिकवितो.

स्पष्टीकरण : वरील वाक्यांपैकी शेवटच्या वाक्यामध्ये शिकवितो या क्रियापदामधून मित्राला शिकण्याची क्रिया करण्यासाठी राजू प्रयत्न करतो असा अर्थ वरील वाक्यामध्ये अभिप्रेत आहे.राजूकडून जी क्रिया घडविण्यात येते आहे त्या क्रीयापादालाच प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.

प्रायोजक क्रियापद दोन प्रकारांनी तयार होतात :

  • १. मूळ धातूला ‘व’ हा प्रत्यय लागून तयार झालेले.
हसतोहसवतोहसवितो
बसतोबसवतोबसवितो
झोपतोझोपवतोझोपवितो
चालतोचालवतोचालवितो
पळतोपळवतोपळवितो

वरील शब्दात ‘‘ य अक्षरापुढे ‘‘ हा आगम म्हणजे नवीन वर्ण आलेला आहे याला इडागम असे म्हणतात.

  • २. मूळ धातूतील आद्याक्षरात वृद्धी किंवा गुण होतो.
गळणेगाळणे
चरणेचारणे
मरणेमारणे

शक्य क्रियापद : 

वाक्यामधील जे साधित धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवितात त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात. वाक्यामधील ज्या क्रियापदाद्वारे कर्त्याची क्रिया करण्याचे सामर्थ्य व्यक्त होते किंवा कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता आहे हे समजते त्या क्रियापदाला शक्य क्रियापद असे म्हणतात.

उदा :

  1. मला आता अभ्यास करवते.
  2. माझ्याकडून आता चालवते.
  3. मला दररोज वीस किलोमीटर चालवते.

स्पष्टीकरण : वरील उदाहरणातील वाक्यामध्ये करवते, चालवते या क्रियापदामुळे कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता दिसून येते. म्हणून त्यांना शक्य क्रियापदे म्हणतात.

अनियमित क्रियापद : 

मराठी व्याकरणामध्ये जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचा मुळधातू उपलब्ध नसतो तेव्हा अशा वाक्यातील क्रियापदाला अनियमित किंवा गौण क्रियापद असे म्हणतात.मराठी भाषेत असे काही धातू आहेत कि ज्यांना काळाची किंवा अर्थाचे प्रत्यय न लावताच ते वेगवेगळ्या प्रकारे बोलले जातात किंवा वापरले जातात तेंव्हा त्यांना गौण क्रियापदे किंवा अनियमित क्रियापदे असे म्हणतात. आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, नलगे या क्रियापदांची रूपे अशा प्रकारची आहेत.

उदा :

  1. हवा सगळीकडे आहे.
  2. कुणीही खोटे बोलू नये.
  3. त्याला जेवण पाहिजे.

स्पष्टीकरण : वरील वाक्यामध्ये आहे, नये, पाहिजे ही क्रियापदे वापरली आहेत परंतू वाक्यात मुळधातू उपलब्ध नाही म्हणून अशा क्रियापदांना अनियमित क्रियापद किंवा गौण क्रियापद असे म्हणतात.

भावकर्तृक क्रियापद : 

ज्या शब्दातील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हाच क्रियापदाचा कर्ता मानावा लागतो अशा क्रियापदाना भावकर्तृक क्रियापदे असे म्हणतात. अशा क्रियापदांचा कर्ता हा वाक्यात येताना स्पष्ट नसतो म्हणून त्यांना अकर्तृक क्रियापदे असे म्हणतात. व्याकरणामध्ये काही वाक्यामध्ये क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हा क्रियापदाचा कर्ता मानला जातो अशा क्रियापदाला भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात.

उदा :

  1. आभाळ खूपच गळगळते.
  2. उन्हामुळे त्याला मळमळले.

स्पष्टीकरण : वरील वाक्यामध्ये गळगळते,मळमळले ही क्रियापदे आहेत या क्रियापदाने दर्शविलेली क्रिया कोणी घडून आणली याचा आपणास अर्थबोध होताना स्पष्ट दिसत नाही.

क्रियापद व त्याचे प्रकार : 

करणरूप आणि अकरणरूप : 

जेंव्हा वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान किंवा क्रियाहि होकारार्थी असते तेंव्हा क्रियापदाच्या रुपाला करणरूप असे म्हणतात व हि क्रिया किंवा विधान जेंव्हा नकारार्थी असते किंवा त्यातून नकार दर्शविला जातो तेंव्हा क्रियापदाच्या त्या रुपाला अकररूप असे म्हणतात.

उदा :

  1. सर्वांनी खरे बोलावे. ( करणरूप )
  2. सर्वांनी खोटे बोलू नये. ( अकरणरूप )

स्पष्टीकरण : वरील वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये क्रियापदाचा होकारार्थी अर्थ लक्षात यतो तर दुसऱ्या वाक्यामध्ये नकारार्थी क्रियापद दिसते त्याला करणरूप व अकरणरूप क्रियापद असे म्हणतात.

स्वार्थी क्रियापद : 

वाक्यामध्ये जेंव्हा स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मुळचा अर्थ किंवा क्रियेचे विधान तोच त्याचा अर्थ असतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ एखाद्या विशिष्ट काळाचा बोध होतो व आज्ञा, विधी, किंवा संकेत वगेरे अर्थाचा बोध न होता क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच लक्षात येतो तेंव्हा त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची सर्व काळातील रूपे ही स्वार्थी क्रियापदे आहेत.

उदा :

  1. मुले जेवण करतात.
  2. ती निघून गेली.

विध्यर्थी क्रियापद : 

मराठी व्याकरणामध्ये क्रियापद व त्यांचे प्रकार यांचा अभ्यास करताना जेंव्हा एखाद्या वाक्यातील क्रियापदाच्या स्वरूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्या क्रीयापादास विध्यर्थी क्रियापद असे म्हणतात.

उदा :

  1. मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी. ( कर्तव्य )
  2. परीक्षेत मला चांगले गुण मिळावे. ( शक्यता )
  3. आता पाउस थांबवा. ( इच्छा )

आज्ञार्थी क्रियापद : 

जेंव्हा एखाद्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना करणे, विनंती करणे किंवा उपदेश करणे या गोष्टीचा अर्थबोध होतो तेंव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात.

उदा :

  1. मुलांनो, सर्वांनी हात वर करा. ( आज्ञा )
  2. देवी, त्याची इच्छा पूर्ण कर. ( प्रार्थना )
  3. माझे एवढे काम करून देसाल. ( विनंती )

संकेतार्थी क्रियापद : 

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून संकेत म्हणजे अट घालणे असे स्पस्त होते तेंव्हा वाक्यातील क्रियापदावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते असे समजते, तेंव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात.

उदा :

  1. मला जर बरे असते, तर मी भाग घेतला असता.
  2. निमंत्रण आले, तर मी नक्की येईन.
  3. पाऊस आला असता , तर फार बरे झाले असते.

FAQ : नेहमी विचारले जाणारे प्रश्न

क्रियापद म्हणजे काय?

क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यसाठी वापरला जाणारा विकारी शब्द ‘क्रियावाचक शब्द‘ होय. व्याकरणामध्ये ‘अस’ या धातूने क्रिया दर्शवली जाते तर ‘हो’ या धातूने क्रीयेमधील स्थित्यंतर दाखविले जाते, अशा शब्दानासुद्धा व्याकरणात क्रियापदे असे म्हणतात.

वाक्यातील कर्ता व कर्म कसे शोधतात ?

एखाद्या वाक्यामधील कर्ता शोधताना सर्वप्रथम त्या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा लागतो व त्याला ‘णारा’ हा प्रत्यय लावून कोण ? असा वाक्यामध्ये प्रश्न केल्यावर वाक्यातील कर्ता मिळतो.

सकर्मक व अकर्मक क्रियापद म्हणजे काय?

एखाद्या वाक्यामध्ये ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते, त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. सकर्मक क्रीयापदामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्याला अकर्मक क्रियापद आसे म्हणतात.

प्रायोजक क्रियापद म्हणजे काय?

वाक्यामध्ये जेंव्हा मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता हा क्रिया स्वतः करीत नसून ती क्रिया तो दुस-या कोणाला तरी करावयास लावत आहे असा जेंव्हा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात.

सारांश : Conclusion :

अशाप्रकारे आपण वरीलप्रमाणे मराठी व्याकरणातील महत्वपूर्ण क्रियापद व त्याचे प्रकार हा भाग सखोलपणे अभ्यासाला. यामधून क्रियापद कशाला म्हणतात? क्रियापदाचे प्रकार कोणकोणते आहेत व ते कोणत्या प्रकारे आपण व्याकरणामध्ये वापरू शकतो याबद्दल माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर क्रियापदांच्या विविध प्रकारांचा उदाहरणासह आपण सखोल अभ्यास या भागामध्ये केलेला आहे. शक्य क्रियापद म्हणजे काय? तसेच स्वार्थी क्रियापद, विध्यार्थी क्रियापद आणि अशाप्रकारच्या विविध क्रियापदांच्या प्रकारांचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून अभ्यास कसा करावा याबद्दल आपण या क्रियापद व त्याचे प्रकार या भागामध्ये माहिती जाणून घेतली आहे.

शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकारसमानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्दअलंकार

5 COMMENTS

  1. अतिशय उत्तम माहिती सोप्या भाषेत दिली आपण, साईट पण मस्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here